पारोळा प्रतिनिधी – तालुक्यातील शेवगे बुदुक येथे तीन शेतकऱ्यांचा १३८ क्विंटल कापूस ट्रकची नंबर प्लेट बनावट वापरून त्यात भरून नेत कापूस रस्त्यात परस्पर विकून फसवणूक केल्याची घटना घडली.
तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील अशोक नथू पाटील,प्रल्हाद नथू पाटील,दिनेश एकनाथ पाटील यांनी आपल्या शेतात कापूस पेरून तो साठवण केला होता.
यंदा राज्यात कापसाला खूपच कमी भाव असल्याने तिघांनी मिळून गुजरात येथील कढी या ठिकाणी दोन पैसा जास्त मिळेल या आशेने एका गाडीत कापूस भरून विकण्याचे ठरवले. त्यानुसार दिनांक १३ रोजी जळगाव येथील हसीन रशीद खानुबेगवाला यांचे आदर्श ट्रान्सपोर्ट च्या माध्यमातून त्यांनी दहा टायर ट्रक जी जे ०२ एक्स एक्स १०७५ हिस शेवगे बुद्रुक येथे कापूस भरण्यासाठी पाठवीले होते.
त्यानुसार दिनांक १४ रोजी गाडीत १३८ क्विंटल कापूस भरल्यानंतर गाडी गुजरात राज्यात कढी कडे रवाना झाली,मात्र दिनांक १५ रोजी शेतकऱ्यांनी ट्रक चालकाशी संपर्क केला असता चालकाचा मोबाईल बंद येऊन संपर्क तुटला,याबाबत शेतकऱ्यांनी ट्रान्सपोर्ट मालकाशी संपर्क साधुन गाडी चालकाचे नाव लायसन्स व गाडी विषयी सांगितल्यावर त्या नंबरची गाडी भावनगर या ठिकाणी त्यांच्या मालकाच्या घरीच उभी असुन तिच्यात कुठल्याही प्रकारच्या कापूस भरलेला नसल्याचे चौकशीनंतर ट्रान्सपोर्ट मालकाने शेतकऱ्यांना सांगितले.
या अज्ञात ट्रक चालकाने वाटेतच कुठेतरी ट्रक मधील १३८ क्विंटल कापूस त्याची किंमत सुमारे ९ लाख ९६ हजार एकशे वीस रुपयांचा विकून पसार झाले आहे,याबाबत सदर ट्रान्सपोर्ट मालकाने पाठवलेली गाडी ही अज्ञात चोरट्यांची होती त्यांनी गाडीचा नंबर प्लेट बदलून शेतकऱ्यांकडून कापूस घेऊन पसार झाले म्हणून दिनांक १५ रोजी अज्ञात ट्रक चालक व ट्रान्सपोर्ट मालकाविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे करीत आहेत.
Leave a Reply