यवतमाळ – शिवसेनेतील अभुपूर्व फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरून पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेना सोडून गेलेले अनेक माजी आमदार, खासदार तसेच मंत्री ठाकरे गटात परत येत आहेत. इतकंच नाही, तर भाजपमध्ये नाराज असलेले काही नेते देखील ठाकरे गटाच्या वाटेवर आहे. त्यामुळे शिंदे गटाचं टेन्शन वाढलं आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील भाजपचे नेते आणि दिग्रसचे माजी आमदार संजय देशमुख ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. आपल्या शेकडो समर्थकांसह ते मुंबईतील मातोश्री येथे जाऊन शिवबंधन बांधणार आहेत. संजय देशमुख यांच्या रूपाने शिवसेना ठाकरे गटाला यवतमाळ जिल्ह्यात मोठे बळ मिळणार आहे.
संजय देशमुख ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याने भाजपला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. दुसरीकडे शिंदे गटाचंही टेन्शन वाढलं आहे. कारण, संजय देशमुख यांची यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, यवतमाळ आणि आर्णी मतदारसंघात मोठी ताकद आहे.
शिंदे गटात गेलेल्या मंत्री संजय राठोड यांना रोखण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून हा प्रयत्न केला जात असल्याची माहिती आहे. दरम्यान, यापूर्वी देखील संजय देशमुख ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता.
कोण आहेत संजय देशमुख?
१९९८ पासून संजय देशमुख हे राजकारणात सक्रिय झाले होते. सुरुवातीला त्यांनी संजय राठोड यांच्यासोबत शिवसेनेसोबत काम केले. मात्र, त्यानंतर अपक्ष निवडणूक लढवत त्यांनी १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. तेव्हापासून देशमुख आणि राठोड कट्टर विरोधक आहेत.
दरम्यान, संजय राठोड यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांना राजकीय धडा शिकवण्यासाठी पाऊलं टाकायला सुरुवात केली आहे. यातील सेनेचा पहिला ‘मोहरा’ हे संजय देशमुख असण्याची शक्यता आहे. त्यामुळे यवतमाळमध्ये पुन्हा संजय विरुद्ध संजय असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
Leave a Reply