एरंडोल (प्रतिनिधी) : एरंडोल तालुक्यातील उमरदे गावाजवळ भरधाव वेगाने जाणारे चार वाहने एकमेकांवर धडकले. यात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला तर रिक्षा चालकासह पाच जण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
रामकृष्ण भागवत पाटील (वय ३०, रा. ठाकरेनगर, पुनगावरोड पाचोरा) असं अपघातातील मृत तरुणाचे नाव आहे. रविवारी दि. ५ मे रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास एरंडोल कडून नेरीकडे जाणारा ट्रक क्रमांक (आर.जे.१० जी बी ८५२८), म्हसावदकडून एरंडोलकडे येणारी आर्टिगा क्रमांक (एम.एच.१८ बीसी १४०८), रिक्षा क्रमांक (एमएच १९ व्ही १२६७) आणि मोटारसायकल क्रमांक (एमएच १९ डीक्यू ८१४७) अशा चार वाहनांचा उमरदे जवळ अपघात झाला. अपघातात दुचाकीस्वार रामकृष्ण भागवत पाटील (वय ३०,रा. ठाकरेनगर, पुनगावरोड पाचोरा) हा युवक जागीच ठार झाला तर रिक्षासह अन्य वाहनातील विनोद शांताराम मालुबाई सोनवणे, रा.उमरदे, विक्रम पाटील रा. भातखेडे, नवल दोधू मोरे रा.उमरदे, बेबाबाई बाळू पाटील रा. भातखेडे, विक्रम विठ्ठल पाटील रा. भातखेडा असे पाच जण गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर मोठा आवाज झाल्यामुळे शेतातील मजूर व ग्रामस्थांनी अपघातस्थळी जाऊन जखमींना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, अनिल पाटील, मिलिंद कुमावत आदींनी अपघातस्थळी जाऊन मृत व जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे.
Leave a Reply