एरंडोल ( प्रतिनिधी) : प्लॉट विक्री च्या वादातून व कौटुंबिक कारणावरून विमलबाई रोहिदास मोहिते (बेलदार) वय ६० वर्षे या वृद्धेचा दगडावर आपटून तिच्याच मुलाने व सुनेने हृदयद्रावक हत्या केल्याची घटना येथील केवडीपूरा भागात रविवारी भल्या पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशन ला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुलगा बापू रोहिदास मोहिते(बेलदार) वय -४० व सून शिवराबाई बापू मोहिते वय-३५ यांना ताब्यात घेऊन अटकेची प्रक्रिया सायंकाळ पर्यंत सुरू होती.
या घटनेबाबत मृत महिलेच्या बहिणीच्या मुलाने एरंडोल पोलिस स्टेशन ला फिर्याद दिली. मृत महिलेच्या राहत्या घराशेजारी तिच्या नावे असलेला खुला भुखंड मुलगा बापू मोहिते यास विकायचा असल्याने मुलगा व सून वारंवार त्रास देत व मारहाण करीत असल्यामुळे मृत महिला ही धरणगाव तालुक्यातील मुसळी येथील नातेवाईकांकडे काहीकाळ वास्तव्यास होती.
समाजातील प्रतिष्ठित लोकांनी मुलगा व सून यांस समजावून विमलबाई हिस एरंडोल येथे एकत्र राहण्यास पाठवले होते.
रविवारी पहाटे साडेतीन वाजता दोन्ही आरोपींनी दगडाने ठेचून विमलबाई मोहिते हीचा निर्घृण खून केला.
पोलिस निरीक्षक सतिश गोराडे सहायक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे पोलिस उपनिरीक्षक शरद बागल व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन गुन्ह्यात वापरलेला दगड हस्तगत केला असून तपास पोलिस निरीक्षक गोराडे हे करित आहेत.
Leave a Reply