एरंडोल – येथे गटारी व जलवाहिन्या टाकण्याच्या कामांमुळे रस्त्यांची लागलेली वाट गारा व चिखलाच्या साम्राज्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन या प्रमुख समस्यांचे निराकरण व्हावे व मुलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात या प्रमुख मागण्यांसाठी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तालुकाध्यक्ष अमित पाटील व माजी नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात अमळनेर नाक्यानजीक राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर मंगळवारी सकाळी जवळपास ३० मिनिटे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला थांबलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.यावेळी एरंडोल न.पा.चे कार्यालय अधीक्षक विनोद पाटील व बांधकाम अभियंता देवेंद्र शिंदे यांनी आंदोलकांकडून निवेदन स्विकारले.एरंडोल येथे अमृत योजने अंतर्गत शहरात नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या व नवीन वसाहतींमध्ये गटारींचे बांधकाम करण्यात आले.यामुळे कच्च्या रस्त्यांची कमालीची दुरावस्था झाली.सध्या रोज होणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवर गारा व चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.त्यामुळे शाळकरी मुले, मुली व नागरिकांना गारा तुडवत चालणे अवघड झाले आहे.या पार्श्वभूमीवर एरंडोल न.पा. तर्फे रस्त्यांवर कच व मुरूम लवकरात लवकर टाकण्यात यावा अशी मागणी आंदोलकांतर्फे करण्यात आली आहे.
अमृत योजना निर्धारित वेळेत पूर्ण करावी व भुयारी गटारीचे काम व्हावे, नवीन वसाहतींमध्ये सिमेंट काॅंक्रीटचे रस्ते व्हावेत, शासकीय योजनांचे ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज स्विकारण्यात यावे, शेतकऱ्यांसाठी मिश्र खतांचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व्हावा.खतांची जादा किंमतीने विक्री होण्यास आळा बसावा अशा मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
या रास्ता रोको आंदोलनात डॉ.सुरेश पाटील,नवल पाटील,गोरख चौधरी, राजेंद्र शिंदे, गजानन पाटील, नाना देवरे,बापू नंदगावकर, प्रा.सुहास महाजन, रमेश पाटील, रविंद्र लाडगे, गणेश पाटील, हितेश महाजन, जगदीश मोरे,शेखर पाटील, भुषण देवरे, नंदलाल शर्मा, संजय पाटील,हिंमत महाजन, भय्यासाहेब सोनवणे, कैलास महाजन, सुदर्शन बागुल,बाळू पाटील, विकास देशमुख,हिंमत पाटील, मुश्ताक शेख, आदी कार्यकर्ते, नागरिक व कॉलनी परिसरातील महिला सहभागी होते.
यावेळी सहायक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे व पोलीस उपनिरीक्षक शरद बागल व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
Leave a Reply