एरंडोल -शहरात ग्रामीण भागासह २७ ऑगस्ट २०२५ रोजी जल्लोषात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला.येथे १८ सार्वजनिक गणेश मंडळांनी वाजत गाजत आपल्या गणेश मुर्तींची मिरवणूक काढून मंडळाच्या मंडपात प्रतिष्ठापना केली. याशिवाय शहरात लहान मोठी जवळपास १५० ते २०० गणेश मंडळांनी श्रींची उत्साहात प्रतिष्ठापना केली.
गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या मंडळाच्या मिरवणुकीत वाद्यांच्या तालावर थिरकत होते. यावेळी बालगोपाल मंडळींच्या उत्साहाला सुध्दा उधाण आले होते. शहराच्या मेनरोडवर भगवा चौकापासून बुधवार दरवाज्यापर्यंत दिवसभर गणेशमय वातावरण निर्माण झाले. तसेच घरगुती गणेश स्थापना करणाऱ्या कुटुंबांची मुर्ती व इतर साहित्य खरेदीसाठी मेनरोडवर तुफान गर्दी झाली होती.परिणामी मेनरोडला दिवसभर यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले.
एरंडोल येथे जय गुरु व्यायाम शाळा,सावता माळी गणेश मंडळ, नागराज गणेश मंडळ, ज्ञानदीप गणेश मंडळ, बालमित्र गणेश मंडळ, सर्वोदय गणेश मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज चौक गणेश मंडळ,मरिमाता गणेश मंडळ आदी मंडळातर्फे श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. सार्वजनिक गणेश मंडळ यांचा गणेशोत्सव १० दिवसांचा असतो.१० व्या दिवशी संध्याकाळी सर्व गणेश मंडळांची एकच श्री विसर्जन मिरवणूक निघते.दरम्यान दररोज सकाळ संध्याकाळ श्रींची आरती, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन याप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.एकंदरीत येथे श्रींची स्थापना शांततेत करण्यात आली.

Leave a Reply